जळगाव (प्रतिनिधी) – येथील इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नूतन कार्यकारिणीचा रविवारी दि. २३ रोजी पदग्रहण सोहळा एका खाजगी संस्थेच्या ठिकाणी पार पडणार आहे. कार्यक्रमाला काही राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, या सोहळ्यावर आयएमएच्या सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आयएमए संस्था राजकीय करण्याचा प्रयत्न नवीन कार्यकारिणी करीत असल्याची चर्चा सदस्यांमध्ये रंगली आहे. संस्था राजकीय मंडळींच्या हाताखाली काम करणार काय ? असा सवाल आयएमएच्या सदस्यांमध्ये निर्माण झाला आहे.
आयएमए संस्थेच्या नवीन वार्षिक कार्यकारीणीचा पदग्रहण सोहळा रविवारी २३ रोजी एका खाजगी संस्थेच्या ठिकाणी नूतन अध्यक्ष सुनील नाहाटा व सचिव डॉ. तुषार बेंडाळे यांनी आयोजित केला आहे. कार्यक्रमाला जिल्ह्यातील मोठे राजकीय पुढारी देखील आमंत्रित केले आहे. आयएमए संस्थेचा स्वतःचा असा २०० क्षमतेचा सभागृह शहरात व. वा. वाचनालय समोर आहे. असे असताना पदग्रहण सोहळा खाजगी संस्थेत घेण्याचे कारण काय ? तसेच पदग्रहण सोहळ्याला आजवर कोणी पदाधिकाऱ्यांनी राजकीय व्यक्तीनी आमंत्रीत करण्याची गरज काय ? असा सवाल सदस्यांनी विचारला आहे.
मावळते अध्यक्ष डॉ. दीपक आठवले व मावळते सचिव डॉ. जितेंद्र कोल्हे यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक कौतुकास्पद निर्णय घेतले. तसेच, चांगले उपक्रम राबविले. डॉक्टरांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला. आयएमए सदस्यांनी त्यांच्या कार्यकाळाची स्तुती केली आहे. आता हे मावळते पदाधिकारी नवीन पदाधिकाऱ्याना पदभार सोपविणार आहे. हा कार्यक्रम आयएमए सभागृहात होणे सदस्यांना अपेक्षित होते. मात्र नुकत्याच झालेल्या बैठकीत नूतन अध्यक्ष सुनील नाहाटा व सचिव डॉ. तुषार बेंडाळे यांनी खाजगी स्थळाचे नाव व राजकीय पुढाऱ्यांना आमंत्रित केल्याचे सांगताच सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.
मात्र तरीही सदस्यांच्या मतांना विचारात न घेता हा कार्यक्रम खाजगी ठिकाणी होत आहे. आगामी काळात आयएमए संस्थेचे राजकीयकरण होऊ नये अशी माहिती सदस्यांनी दिली आहे.