जळगाव (प्रतिनिधी) – एमआयडीसी परिसरात जी सेक्टरमध्ये असणाऱ्या एका प्लास्टिकच्या कंपनीला १७ एप्रिलला शॉर्टसर्कीटमुळे लागलेल्या आगीत कच्चा माल व मशिनरी जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आगीत जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
खंडू किसन पवार रा. अयोध्या नगर, जळगाव यांच्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. एमआयडीसीतील जी -सेक्टर मधील आकाश प्लास्टिक कंपनीत सोमवारी १७ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास कंपनीतील शार्टसर्कीटमुळे अचानक आग लागली. या आगीत प्लास्टिक बनविण्याचा कच्चा माल आणि मशिनरी जळून खाक झाले होते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महापालिकेचा अग्निशमन विभागाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. आगीत अंदाजे २० लाख रूपयांचे मोठे नुकसान झाले आहे. पुढील तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.