नवी दिल्ली (वृत्तसंथा) – भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त लष्कराने फेटाळले आहे. भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल (ऑपरेशन्स) लेफ्टनंट जनरल परमजितसिंग म्हणाले की, काही प्रसार माध्यमांमध्ये भारताने केलेल्या एअर स्ट्राईक्सची बातमी झळकते आहे. मात्र, हे वृत्त चुकीचे असून आज दिवसभरात सीमेवर कोठेही गोळीबार झालेला नाही.

भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले करण्यास जोरदार सुरुवात केली असून, दहशतवादी तळांना लक्ष्य करण्याचे धोरण अवलंबले आहे. असे वृत्त काही प्रसार माध्यमांनी दिले होते.
अतोनात होणारी बर्फवृष्टी आणि धुके तसेच अंधाराचा फायदा घेत, सीमेपलिकडून हजारो दहशतवादी भारतीय हद्दीत घुसतात. यावर्षीही असे अनेक दहशतवादी सीमेच्या जवळच्या परिसरात गोळा झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाला मिळाली होती. त्याचा विचार करता, या दहशतवाद्यांना भारतीय हद्दीत घुसखोरी करण्यापूर्वीच नामोहरम करण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून, भारतीय वायूदलाने हे एअर स्ट्राईक्स सुरु केले आहेत अशीही माहिती काही माध्यमांद्वारे देण्यात आली होती.
मात्र याबाबत आता भारतीय लष्करातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले असून आज दिवसभरात सीमेवर कोठेही गोळीबार झालेला नाही, तसेच भारतीय वायूसेनेने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याचे वृत्त खोटे असल्याचं स्पष्ट केलंय.







