जळगाव ( प्रतिनिधी ) – यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यात पारवा गावात माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल देवराव ओचावार यांची १५ मेरोजी मध्यरात्री क्रूर हत्या करण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ जळगावतर्फे निषेध नोंदविण्यात आला व अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन यांच्या मार्फत मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले .
या निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने सांगण्यात आले की , सूड भावनेतुन क्रूर हत्या झाल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून समोर आलेले आहे. शासन व प्रशासन भ्रष्टाचार मुक्त, लोकाभिमुख व पारदर्शक चालावे म्हणून काम करणाऱ्या हजारो माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे तथा नागरिकांचे मनोधर्य खच्चीकरण करणारी आहे. ” मृत अनिल देवराव ओचावार यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषी आरोपीना सहा महिन्याच्या आत कठोर शिक्षा मिळावी. कटात सामील असू शकणारे व अपराध्यांना चिथावणी देणारे सरकारी अधिकारी व सूत्रधार यांच्याही मुसक्या अवळाव्यात ते दोषी आढळल्यास त्यांनाही सहआरोपी करण्यात यावे . स्व. अनिल देवराव ओचावार यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी सरकारने तात्काळ दहा लाख रूपयांची अर्थिक मदत जाहिर द्यावी . माहिती अधिकार कार्यकत्यांची सुरक्षा व सरंक्षण या सबंधी शासनाने धोरणात्मक उपाययोजना कराव्यात. माहिती अधिकार कार्यकर्त्यांनि मागणी केली असल्यास आवश्यक तेथे तातडीने पोलीस संरक्षण द्यावे . निवेदन देतांना माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल कोल्हे , शैलेंद्र सपकाळे , नरेंद्र सपकाळे , गुणवंतराव सोनवणे , विठ्ठल भालेराव , चंद्रकांत श्रावणे , रोहित सोनवणे उपस्थित होते .