मुंबई (वृत्तसंस्था) – कोव्हिड 19साठीची लस नोंदणी प्रक्रिया भारतात आता 18 वर्षांवरील सगळ्यांसाठी खुली आहे. 1 मेपासून 18 वर्षांवरील सर्वांसाठीचं लसीकरण सुरू झालेलं आहे. अनेक राज्यांमध्ये उपलब्धतेनुसार 18-44 वयोगटासाठीचं लसीकरण करण्यात येतंय.
महाराष्ट्रासह छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आसाम, केरळ, सिक्कीम यासांरख्या राज्यांनी 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार असल्याचं जाहीर केलंय.
1 मे 2021 पासून लस उत्पादन कंपन्या त्यांच्या एकूण उत्पादनाच्या 50 टक्के डोस केंद्र सरकारला 150 रुपये प्रति डोस दराने देतील. तर राज्य सरकार आणि खासगी हॉस्पिटल्सना थेट लस उत्पादकांकडून डोस विकत घेता येतील.
सर्वांना ही लस मोफत देणार असल्याचं महाराष्ट्र सरकारने जाहीर केलंय. तर खासगी हॉस्पिटल्स लशीचे डोस थेट कंपनीकडून विकत घेऊन त्यावर स्वतःची फी आकारत लसीकरणासाठी त्यांचे दर जाहीर करतील.
लशीसाठी नोंदणी कशी करायची?
कोविनच्या वेबसाईटवरून किंवा कोविन अॅपवरून लसीकरणासाठी नोंदणी करणं बंधनकारक आहे. जेणेकरून लसीकरण केंद्र, तारीख, वेळ इत्यादी माहिती तुम्हाला आधीच कळवलं जाईल.
नोंदणीसाठी https://www.cowin.gov.in/home या वेबसाईटवर जा.
वेबसाईट उघडल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील Register / Sign in yourself या पिवळ्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल आणि त्यावर OTP येईल. तो OTP टाकल्यानंतर नवीन विंडो उघडेल.
त्यानंतर Register for Vaccination ची विंडो दिसेल. फोटो आयडी प्रूफ, फोटो आयडी नंबर, नाव, जन्मतारीख, लिंग आणि सहव्याधी इत्यादी माहिती इथे तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर Register पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर तुम्हाला अकाऊंट डिटेल्स दिसतील. एका मोबाईल नंबरच्या नोंदणीत तुम्हाला तीन जणांसाठी लसीकरणाची नोंद करता येऊ शकते. त्यासाठी Add या पर्यायावर क्लिक करून पुढील नावं आणि त्यांची माहिती समाविष्ट करता येईल. एखादं नाव डिलिट करण्याचाही पर्याय देण्यात आला आहे.
लसीकरणासाठी तुम्हाला नोंदणी करण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी स्वतंत्र स्लॉट बुक करावा लागेल.
पिन कोड टाकल्यानंतर तुम्हाला तिथल्या लसीकरण केंद्रांची यादी दिसेल.
तुम्ही जिल्हावार यादीही शोधू शकता.
नवीन प्रणालीनुसार तुम्हाला एखाद्या लसीकरण केंद्रावर स्लॉट उपलब्ध आहेत वा नाहीत, हे दिसेल. स्लॉट्स उपलब्ध असल्यास ते कोणत्या वयोगटासाठी आहेत, कोणती लस उपलब्ध आहे, हे देखील तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
तुमच्या वयोगटासाठी हा स्लॉट उपलब्ध असल्यास तुम्ही तो बुक करू शकता. तसा मेसेज तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर येईल.
आरोग्य सेतू अॅपवरूनही तुम्हाला ही नोंदणी प्रक्रिया करता येईल. त्यासाठी वाचा – कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवरून लशीसाठी नोंदणी कशी करायची?
लसीकरण केंद्रावर जाताना कुठली कागदपत्रं सोबत हवीत?
लसीकरणासाठी जाणाऱ्या प्रत्येकाला काही कागदपत्रे सोबत आणणं बंधनकारक आहे.
आधार कार्ड, छायाचित्र असलेले मतदान कार्ड, ऑनलाइन नोंदणीच्या वेळी जर आधार कार्ड किंवा मतदान कार्ड या व्यतिरिक्त अन्य फोटो आयडी वापरले असेल तर ते सोबत आणावे लागतील.
पहिला डोस घेतल्यानंतर तुम्ही कोविनला लॉग-इन केल्यावर पहिला डोस घेतलेल्या व्यक्तीचा स्टेटस ‘पार्शली व्हॅक्सिनेटेड’ (Partially Vaccinated) असा दिसेल.
लशीचा पहिला डोस घेतल्यानंतर 6 ते 8 आठवड्याच्या अंतराने तुम्हावा दुसरा डोस घेण्यासाठी स्लॉट बुक करावा लागेल.
लशीचा दुसरा डोस देण्याआधी तुमच्या पहिल्या डोसचे तपशील तपासले जातील आणि त्यानंतरच त्या व्यक्तीला दुसरा डोस देण्यात येईल.
दोन्ही डोस घेतल्यानंतर तुमचा स्टेटस ‘व्हॅक्सिनेटेड’ (Vaccinated) असा होईल. आणि लसीकरण पूर्ण झाल्याचं सर्टिफिकेट तुम्हाला डाऊनलोड करता येईल.