नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशात एकीकडे कोरोनाचं संकट असताना आता ब्लॅक फंगस हा नवा आजार आला आहे. या आजाराचे रुग्णही देशभरात वाढताना दिसत आहेत. कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना म्युकरमायकोसीस हा आजार होत असल्याने देशाची चिंता वाढू लागली आहे. दिवसेंदिवस या रुग्णांची प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारही आता सतर्क झालं आहे. हरियाणा, राजस्थान, तेलंगणा या राज्यांनी या आजाराला महामारी म्हणून घोषित केलं आहे. तर आज केंद्र सरकारनेही सर्व राज्यांना या आजाराची नोंद साथरोग कायद्यात करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह देशांतील अनेक राज्यांमध्ये या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. या आजारावर वेळीच उपचार न घेतल्यास जीवावर बेतण्याची भीती आहे. रुग्ण वाढू लागल्याने केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने ही बाब गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळं या आजाराचा समावेश आता इतर साथींच्या आजारामध्ये होणार आहे. त्यानुसार साथरोग कायद्यानुसार उपाययोजना राज्यांना कराव्या लागणार आहेत.
हरियाणा व राजस्थान सरकारने दोन दिवसांपूर्वीच हा निर्णय घेतला असून हा निर्णय घेणारे हरयाणा हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.व तर आज तेलंगणानेही साथरोग कायद्यात या आजाराचा समावेश केला. त्यापाठोपाठ केंद्र सरकारने सर्वच राज्यांना याबाबत सुचना दिली. त्यामुळं प्रत्येक रुग्णाची नोंद होणार असून देशातील प्रत्यक्ष चित्र समोर येईल. साथरोग कायद्यात या आजाराचा समावेश नसल्याने प्रत्येक रुग्णाची नोंद होत नव्हती. आता त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा काम करेल.
म्युकरमायकोसिस या आजाराचा संसर्ग नाक, तोंड या मार्गाने मेंदूपर्यंत होऊ शकतो. मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यावर उपचारांना एकदम मर्यादा येतात. म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी लागणारी अनेक औषधे महाग आहेत. सध्या प्रामुख्याने कोरोनाची बाधा झालेल्या आणि रोगप्रतिकारक क्षमता दुर्बल असलेल्या अनेकांना म्युकरमायकोसिसची लागण होत आहे. हा नवीन आजार नाही. पण पूर्वी या आजाराचे रुग्ण तुरळक होते. कोरोनानंतर अनेकांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत.
हा आजार संसर्गजन्य आजाराप्रमाणे (साथीच्या आजाराप्रमाणे) पसरण्याचा धोका डॉक्टरांकडून व्यक्त होत आहे. म्युकरमायकोसिस या आजारात अंधत्व येण्याचा धोका आहे. रुग्णाच्या जगण्याची शक्यता जेमतेम ५० टक्के एवढीच आहे. काळ्या बुरशीचा आजार असेही म्युकरमायकोसिस या आजाराला म्हणतात. यात शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना बुरशी येते आणि त्यांची कार्यक्षमता कमी होते. हळू हळू ते अवयव पूर्णपणे निकामी होतात.