जळगाव (प्रतिनिधी) – येथील एमआयडीसी भागातील कुरियर सर्व्हिसच्या ऑफिसच्या सामायिक भिंतीचा दरवाजा व बंद गाळ्याचे कुलूप तोडून ३० लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघड झाल्याने अज्ञात चोरट्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी परिसरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज जवळील सेक्टर एम / १६७ मध्ये इंस्टाकार्ड (फ्लिपकार्ड) कुरियर सर्व्हिसचे ऑफिस आहे. या ऑफिसमध्ये बाहेरगावांहून ऑनलाईन ऑर्डरद्वारे मागविण्यात आलेल्या वस्तू ठेवून ग्राहकांना घरपोच वितरण केले जाते .
मॅनेजर प्रवीण डीवरे हे १८ मार्च रोजी त्यांचे काम आटोपून दुपारी ३.३० वाजता घरी निघून गेले. डिवरे निघून गेल्यावर त्यांचे सहकारी टीम लीडर रणजितसिंग बिरसिंग पाटील व मोहम्मद इरशाद हे रात्री ९.३० वाजेपर्यंत काम करत होते. नंतर ते ऑफिस बंद करून घरी निघून गेले.
दरम्यान, १९ मार्च रोजी बाहेरगावहून येणारा माल खाली करणारा शांताराम वसंत शिंदे याने सकळी ६.३० वाजता व्यवस्थापक प्रवीण डीवरे यांना भ्रमणध्वनीवरून ऑफिसचे सामान अस्ताव्यस्त पडल्याचे व ऑफिसमध्ये चोरी झाल्याचे दिसत असल्याचे सांगितले. डीवरे यांनी लागलीच ऑफिस गाठून पाहणी केली असता त्यांना सामाईक भिंतीचा दरवाजा व बंद गाळ्याचे शटरचे कुलूप तुटलेले आढळून आले. या बंद गाळ्याचे शटरचे कुलूप तोडून सामाईक भिंतीचा दरवाजा तोडून कुरियरच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीत चोरटा १८ मार्च रोजी रात्री १०.३५ च्या सुमारास बंद गाळ्याच्या शटरजवळ दिसत असून रात्री १२.५ मिनिटांनी ऑफिसमध्ये प्रवेश करतांना तर रात्रीच २ वाजून ५ मिनिटांनी ऑफिसमधून बाहेर पाडताना दिसत आहे. दोन लॅपटाॅप व १६ विविध कंपनीचे मोबाईल असे जवळपास २९ लाख ९ हजार ४२४ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.







