धुळे (प्रतिनिधी) – “झन्ना मन्ना” खेळणाऱ्या जुगाऱ्यांनी धाड टाकायला आलेल्या पोलिसांवरच हल्ला चढविल्याची धक्कादायक घटना धुळे तालुक्यात वरखेडे शिवारात घडली आहे. झन्ना-मन्ना खेळणार्यांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने रविवारी रात्री छापा टाकला. त्याचा राग आल्याने जुगाऱ्यांनी पोलिस पथकावरच हल्ला चढविला. पोलिसांना झालेल्या हाणामारीत ५ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. याप्रकरणी २३ जणांवर तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी धरपकड करीत १९ जणांना ताब्यात घेतले. या घटनेमुळे खान्देशात खळबळ उडाली आहे.
वरखेडे गावात दि. २० पासून बहीरम महाराज यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेपुर्वीच रविवारी बहिरम महाराज मंदीर परिसरामागील बाजुस असलेल्या एका घराच्या मागे काही जणांनी अवैधपणे झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा खेळ खेळत होते. याबाबत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रात्री ९ वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला. कारवाई करू नये म्हणून जुगाऱ्यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करीत पोलिस पथकावर हल्ला चढविला. पोकाँ योगेश विजय ठाकुर, मयुर पाटील, तुषार पारधी, जगदिश सुर्यवंशी व योगेश साळवे यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यात पाचही जण जखमी झाले.
पोकाँ योगेश ठाकुर यांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यावरून विलास राजेंद्र मराठे, लक्ष्मण लोटन पाटील, सुधीर दिगंबर धनगर, विपुल राजेंद्र पाटील, राकेश लोटन पवार, नितीन उर्फ सोनु शिवाजी पवार, जयेश अनिल पाटील, नंदु युवराज पाटील, अविनाश शंकर घुमटकर, सागर अरूण पाटील, कैलास प्रदीप पाटील, दिलीप लोटन शिंदे, मयुर अरूण भदाणे, राकेश कैलास पाटील, सागर एकनाथ पाटील, पंडीत सुखदेव पाटील, मच्छिंद नवनीत मराठे, वाल्मीक भिमराव पाटील, अमोल उर्फ गोपाल निवृत्ती चव्हाण, संदीप उर्फ पप्पु राजेंद्र पाटील, रोहीत उर्फ मोन्या सत्यजीत पटेल, विक्की बाबु घुमटकर, शिवाजी यशवंत माळी व इतर सर्व (रा. वरखेडेगांव ता.धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पीएसआय अनिल महाजन करीत आहेत.