मुंबई (प्रतिनिधी) – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यांची सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. राज्यभरातील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांचा संप आज सोमवारी २० रोजी सातव्या दिवशी दिवशी मागे घेण्यात आला आहे. राज्य सरकारी निमसरकारी समन्वय समिती यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सकारात्मक तोडगा निघाला आहे. त्यामुळे हा संप मागे घेण्यात येत असल्याचे समितीचे निमंत्रक विश्वास काटकर यांनी सांगितले आहे. .
गेल्या सात दिवसांपासून राज्यातील कर्मचारी संपावर गेले होते. त्यांनी विविध मागण्यांसाठी कामबंदची हाक दिली होती. राजपत्रित अधिकारी संघटनेबरोबर आज सरकारची या संदर्भात चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाल्यानंतर संप मागे घेण्यात आला. याबाबत विश्वास काटकर म्हणाले, ‘जुनी पेन्शन योजना सुरू होईल. गेल्या सात दिवसांपासून आम्ही संपावर होतो. पण सरकारसोबतची चर्चा यशस्वी झाली आहे. राज्यात जुनी पेन्शन योजना निश्चित सुरू होईल. तसेच संप काळात ज्यांना नोटीसा देण्यात आल्या, त्यामागे घेण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे. कर्मचारी आता कामावर हजर राहणार आहेत’.
जुन्या पेन्शन योजनेसाठी मागील सात दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरु होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत आज चर्चा केली. या चर्चेमध्ये तोडगा निघाला असून उद्यापासून संप मागे घेण्याचा निर्णय संपकऱ्यांनी घेतला आहे.
तीन महिन्यांमध्ये सरकार मागण्या पूर्ण करेल, त्यामुळे उद्यापासून संप मागे घेत आहोत असं संपकऱ्यांच्या वतीने समन्वयक विश्वास काटकर यांनी माध्यमांना ही माहिती दिली असून उद्यापासून कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होण्याचं आवाहन केलं आहे.