जळगाव (प्रतिनिधी) – मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे जागतिक चिमणी दिवसा निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम घेण्यात आला. प्रसंगी विद्यार्थ्यांना चिमणी पक्षाविषयी माहिती देऊन मोफत परळ वाटप करण्यात आले. चिमणी पक्षी संवर्धनाविषयी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
जळगाव जिल्ह्यात उन्हाळा मोठा तीव्र स्वरूपात असतो. अनेक पक्षी, प्राण्यांना प्यायला पाणी मिळत नाही. ही बाब लक्षात घेता व जागतिक चिमणी दिवसाचे औचित्य साधून विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना चिमणी संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली. चिमणी हा निसर्ग घटकातील महत्त्वाचा पक्ष असून तो निसर्ग सौंदर्यात भर घालीत असतो, अशी माहिती संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी विद्यार्थ्यांना दिली.
प्रसंगी विद्यार्थ्यांनी, चिमण्यांसाठी घराच्या गच्चीवर किंवा अंगणात त्यांना पिण्यासाठी पाणी ठेवणार अशी ग्वाही दिली. यावेळी विद्यार्थ्यांना चिमण्यांना पाणी देण्यासाठी मोफत परळ वाटप करण्यात आले. उपक्रमाची संकल्पना संस्थेचे सचिव तथा उपशिक्षक मुकेश नाईक यांची होती. विद्यालयातील मुख्याध्यापिका शितल कोळी व इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.