जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील ख्वॉजामिया नगरातील हॉस्टेलमधून एकाच वेळी चार जणांचे मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. चोरी करणारा चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हापेठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, ख्वॉजामिया रोड, रामकृष्ण कॉम्प्लेक्स वुडलॅण्ड रेस्टॉरंटच्या वर होस्टेल आहे. त्याठिकाणी नोकरदार व शिक्षण घेणारे विद्यार्थी राहतात. रविवारी १९ जून रोजी सकाळी ६ ते ६.३० वाजेच्या दरम्यान होस्टेलमधील तीन मुलांमधून एकुण चार मोबाईल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. यात सुशिल सरजेराव पाटील, नगेंद्रसिंग, रामभाऊ सलूनवाला आणि चेतन पाटील याचे मोबाईल लांबविला आहे. सकाळी साडे सहावाजता रामभाऊ सलूनवाला हे उठल्यावर त्यांना त्यांचा मोबाईल जागेवर आढळून आला नाही. त्यांनी मोबाईल शोधण्याचा प्रयत्न करत असतांना होस्टेलमधील इतर तीन जणांचेही मोबाईल चोरीस गेल्याचे उघड झाले. याबाबत सीसीटीव्हीत चेक केले असताना सकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी हे मोबाईल लांबविल्याचे समोर आले आहे. याबाबत सुशिल सरजेराव पाटील रा. भोरटेक, ता. पाचोरा, जि.जळगाव याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी अडीच वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ तेजराव हुडेकर करीत आहे.