नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीबाबत म्हणजेच 30 जानेवारीबाबत केंद्र सरकारने एक नवा आदेश जारी केला आहे. हा दिवस नेहमीप्रमाणे शहीद दिवसाच्या रुपात साजरा केला जाईल. सोबतच सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांसाठी निर्देश जारी करण्यात आले आहेत. यामध्ये देशाच्या स्वातंत्र्यांसाठी बलिदान देणाऱ्यांच्या स्मरणार्थ मौन ठेवण्यास सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय, यादरम्यान काम आणि हालचालींवरही निर्बंध असतील.

शहीद दिवसासाठी जे आदेश गृह मंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत त्यानुसार, 30 जानेवारीला प्रत्येक वर्षी सकाळी 11 वाजता दोन मिनिटांचं मौन ठेवलं जाईल. त्यासोबतच संपूर्ण देशात त्या दोन मिनिटांसाठी कुठलंही काम किंवा हालचाल होणार नाही. ज्या ठिकाणी सायरनची व्यवस्था असेल त्या ठिकाणी सायरन वाजवून मौनबाबत आठवण करुन दिली जाईल. काही-काही ठिकाणी याबाबत गनने फायर करुनही सूचना दिली जाईल. हा अलर्ट सकाळी 10.59 वाजता केला जाईल. त्यानंतर दोन मिनिटांसाठी मौन ठेवावं लागेल.
ज्या ठिकाणांवर सिग्नल नसेल तिथे सुविधेनुसार कुठल्याही पद्धतीने सूचना पोहोचवली जाऊ शकते. आधी काही कार्यालयांमध्ये मौनदरम्यान कामकाज सुरु राहायचं. सध्या याचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
30 जानेवारी 1948 ला महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. 30 जानेवारी 1948 च्या संध्याकाली जेव्हा सायंकाळच्या प्रार्थनेसाठी जात होते तेव्हा नथुराम गोडसेने त्यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या, यामध्ये महात्मा गांधी यांचा मृत्यू झाला होता.







