जळगाव ( प्रतिनिधी ) – महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी चंद्रकांत डांगे (भाप्रसे) नुकतेच रुजू झाले आहेत. ते २०१० च्या केडरचे भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. महावितरणच्या महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचे सध्या असलेले ४३ ते ४५ टक्के योगदान येत्या वर्षभरात ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प त्यांनी केला आहे.
डांगे यांनी प्रतिष्ठित आयआयटी खरगपूर येथून औद्योगिक अभियांत्रिकी या विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून १९९४ मध्ये त्यांची उपजिल्हाधिकारीपदी निवड झाली. नागपूरचे अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव महानगरपालिका आयुक्त, मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागात सहसचिव, ठाण्याच्या आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त, मीरा-भाईंदर महापालिकेचे आयुक्त, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक आदी पदावर त्यांनी कामाचा ठसा उमटवला प्रशासकीय सेवेतील २८ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मीरा-भाईंदर महानगरपालिकेत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. त्यात स्थलांतरित मजुरांच्या निवास-भोजनापासून रुग्णांच्या उपचारासाठी केलेल्या प्रभावी उपाययोजनांचा समावेश आहे.
सहव्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर डांगे यांनी कोकण प्रादेशिक विभागातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठ्याबाबत आश्वासित करताना महसूल वाढीला प्राधान्य देण्याचा संकल्प केला आहे. भांडूप, कल्याण, रत्नागिरी, नाशिक, जळगाव या परिमंडलांमध्ये वीजचोरीला प्रभावी प्रतिबंध, वीज ग्राहकांकडून चालू वीजबिलासह थकबाकी वसुलीवर भर राहणार असल्याचे स्पष्ट करतानाच त्यांनी महावितरणच्या महसुलात कोकण प्रादेशिक विभागाचा वाटा ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा संकल्प केला आहे.