जळगाव ( प्रतिनिधी ) – मारोतीपेठ भागातील तरूणाने धावत्या रेल्वेखाली स्वतः उडी घेत आत्महत्या केली त्याने आत्महत्या करण्याचे कारण लगेच समजू शकले नाही. प्रसनजीत प्राणकीशन कबीराज (वय-१८ , रा. बलीदेवांगंज जि. हुगली, पश्चिम बंगाल, ह.मु. मारोती पेठ, जळगाव ) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.
प्रसनजीत कबीराज हा गेल्या दीड महिन्यांपासून सोने कारागिर म्हणून कामासाठी जळगावात आला होता. मलाईकर यांच्याकडे तो सोन्याची दागिने तयार करण्याचे काम करत होता. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर रात्री तो सहकार्यांना मी बाहेरुन नाश्ता करुन येतो असे सांगून दुकानातून बाहेर पडला. नंतर त्याने आसोदा रेल्वे गेटजवळील अपलाईनवरील खांबा क्रमांक ४२० ते ४२२ दरम्यान धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपविली. स्टेशन मास्तर एम. अग्रवाल यांनी या घटनेची माहिती शनिपेठ पोलिसांना दिली. पो उ नि सुरेश सपकाळे व स फौ रघुनाथ महाजन यांनी घटनास्थळी जाऊन त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केला . मयताची अंगाची झडती घेतली असता, त्याच्याकडे मोबाईल व आधाराकार्ड आढळून आले. त्यावरुन त्याची ओळख पटली. प्रसनजीत एकूलता एक मुलगा होता.