धरणगाव ( प्रतिनिधी ) – शेतातील गुरांचा चारा कापून आणल्याच्या संशयावरून धरणगाव तालुक्यातील बोरखेडा गावात दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी १९ एप्रिल रोजी रात्री उशीरा धरणगाव पोलीस स्टेशनला परस्परविरोधात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीकांत दिलीप पाटील (वय-३३) रा. बोरखेडा ता. धरणगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्रीकांत पाटील यांच्या शेतातील चारा चोरी गेल्यानंतर मंगळवारी १८ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता घरी असतांना गावातील ज्ञानेश्वर उर्फ पंकज विश्वनाथ पाटील याला विचारले. याचा राग आल्याने ज्ञानेश्वर पाटील, गजानन कैलास पाटील, आकाश रूपसिंग पाटील यांनी श्रीकांत पाटील यांना आणि त्यांचे वडील दिलीप पाटील, काका कांतीलाल पाटील यांना घरात घुसून मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.
तर दुसऱ्या फिर्यादीत गजानन कैलास पाटील यांनी म्हटले आहे की, शेतातील गुरांचा चारा चोरून नेल्याच्या संशयावरून गावात राहणारे श्रीकांत पाटील, दिलीप पाटील आणि कांतीलाल पाटील यांनी शालक पंकज विश्वनाथ पाटील यांला घरासमोर मारहाण करण्यास सुरूवात केली. तर भांडण सोडविण्यासाठी गजानन पाटील हे गेले असता त्याला देखील मारहण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी बुधवारी १९ एप्रिल रोजी रात्री उशीरात धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दिपक पाटील करीत आहे.