नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – भारत-चीन लडाखच्या सीमेवरील तणाव शांत होण्याचे नाव घेत नाही. मुजोर चीनकडून कुरापती सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. २९-३० ऑगस्ट रोजी चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारताच्या जवानांनी तो प्रयत्न उधळून लावला. मात्र, सोमवारी पुन्हा एकदा चीनकडून घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, जवानांनी पुन्हा योग्य प्रत्युत्तर देत त्यांचा डाव उधळला.

माहितीनुसार, रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, भारतीय जवानांनी त्यांचा घुसखोरी करण्याचा डाव उधळून लावला. चीनच्या ७ ते ८ मोठ्या गाड्या चेपुझी कॅम्पवरून भारतीय सीमेच्या दिशेने येत होत्या. परंतु जवानांनी घेरल्याचे पाहताच त्या गाड्या माघारी परतल्या असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, अनेकवेळा केलेल्या चर्चा आणि कराराचं चीनकडून वारंवार उल्लंघन करण्यात येत आहे. गॅलव्हान खोऱ्यानंतर आता पुन्हा एकदा लडाखमध्ये तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यात दोन्ही बाजूंनी आपले लष्कर कोठे ठेवायचे, याबाबत एकमत झाले आहे. मात्र ही हद्द ओलांडण्याचा प्रयत्न चीनी सैन्य वारंवार करत आहे.
प्रत्यक्ष सीमेवर असणारी स्थिती बदलण्याचा चीनी सैनिकांचा हेतू होता. पॅनगोंग टीसोच्या दक्षिणेकडून ही घुसखोरी करण्याचा डाव आखला होता. तो लक्षात घेऊन भारतीय जवानांनी आपल्या ठाणी मजबूत केली. चीनच्या या करावायांची दखल घेत भारतीय बाजूनेही तोफदळ, शस्त्रसाठा सज्ज ठेवण्यात आला आहे. जमीनीवरून हवेत मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे तैनात करण्यात आली आहेत.







