पुणे (वृत्तसंस्था) – आलिशान एसयूव्ही मोटारीमधून रेमडेसिव्हर इंजेक्शन विकायला आलेल्या दोघा मावस भावांना खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्या जवळून तीन इंजेक्शन हस्तगत करण्यात आली असून ती 1 लाख 5 हजारांना विकायच्या तयारीत होते.

निखील बाबुराव जाधव (वय 24, रा.आंबेगाव पठार व मयूर विजय चव्हाण (वय 22, रा.वराळे, तळेगाव दाभाडे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेही आरोपी उच्चभ्रू घरातील असून, एकजणबी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. लॉक डाऊन असतानाही ते तळेगाव येथून इंजेक्शन विकण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, सहायक पोलिस निरीक्षक संदिप बुवा पथकासह गस्त घालत असताना पोलिस अंमलदार राजेंद्र लांडगे व विवेक जाधव यांना दोन तरुण रेमडेसिव्हर इंजेक्शन प्रत्येकी 37 हजार रुपयांचा विकत असल्याची खबर मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाव्दारे संपर्क साधून सापळा रचला. निखील व मयुर दोघेही तळेगाववरुन तीन इंजेक्शन घेऊन एसयूव्ही मोटारीमधून आले. त्यांना चौकशी करुन ताब्यात घेतले असता त्यांनी हे इंजेक्शन मैत्रिणीने विक्री करण्यासाठी दिले असल्याचे सांगितले. याप्रकरणी औषध निरीक्षक सुहास सावंत यांनी तक्रार दाखल केली आहे. ही कारवाई सहायक पोलिस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील, पोलिस अंमलदार मधुकर तुपसौंदर, राजेंद्र लांडगे, नितीन कांबळे, विवेक जाधव व अमर पवार यांच्या पथकाने केली.
मैत्रीणीच्या वडिलांना कोरोना झाला होता. यासाठी तिने रेमडेसिव्हर इंजेक्शन घेऊन ठेवली होती. ते बरे झाल्यावर राहिलेली तीन इंजेक्शन तिने विकण्यासाठी आरोपींकडे दिली होती. आरोपी इंजेक्शनसाठी ग्राहक शोधत असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. यानंतर त्यांनी बनावट ग्राहकाव्दारे आरोपींशी संपर्क साधला होता.







