जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील रामदेववाडी येथे एका घरात सामानाची तोडफोड करत लाठ्या काठ्यांनी मारहाण करून तसेच विळ्याने वार करीत कुटुंबातील पाच जणांना बेदम मारहाण केल्याची घटना सोमवार १ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. तालुका पोलीस स्टेशनला ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रामदेव वाडी येथे विशाल अजमल जाधव कुटुंबासह वास्तव्यास आहेत. सोमवार १ मे रोजी रात्री ते कुटूंबीयांसह घरी असताना त्यांच्याकडे गावातील आठ-दहा लोक आले. कुठलेही कारण नसताना या ग्रामस्थांनी अजमल जाधव यांच्या दुचाकीची तसेच घरात तोडफोड करण्यास सुरुवात केली. जाधव कुटूंबावर हल्ला करणाऱ्यांपैकी नरेश जाधव यांनी विळ्याने करुणाबाई अजमल जाधव यांच्या उजव्या हातावर वार करुन जखमी केले. तर विलास रामदेव जाधव, युवराज रमेश जाधव यांनी विशाल जाधव यांच्या उजव्या पायावर तसेच डोक्यावर मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात घरातील मेवाबाई पुना जाधव, पुना मंगू जाधव या दोघांनाही मारहाण केली.
यावेळी विशाल अजमल जाधव यांच्याबरोबर रवींद्र राजमल जाधव यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन हल्लेखोरांनी घरातील संसारपयोगी साहित्याची तोडफोड करत मारहाण केली. याप्रकरणी जखमी विशाल अजमल जाधव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रामदास काळू जाधव, विलास रामदास जाधव, खुशाल रामदास जाधव, नरेश रामदास जाधव, युवराज रमेश जाधव, धनराज रमेश जाधव, रमेश काळू जाधव, कमलाबाई रामदास जाधव, (सर्व रा. रामदेववाडी) या आठ जणांविरुद्ध दंगलीचा तसेच जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहेत.