एरंडोल ( प्रतिनिधी ) – गॅस कटरच्या मदतीने युनियन बँकेचे एटीएम फोडून ९ लाख ५५ हजार रूपयांची रोकड लांबविल्याची धक्कादायक घटना काल घडली कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एरंडोल तालुक्यातील कासोदा शहरात बिर्ला चौकात युनियन बँकेचे एटीएम आहे. ३१ मे रोजी रात्री ते १ जून रोजी सकाळी दरम्यान अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरचा वापर करून एटीएम मशिन फोडून त्यातील ९ लाख ५५ हजार रूपयांची रोकड लांबविली आहे. घटनेची माहिती मिळताच कासोदाचे स पो नि निता कायटे यांच्यासह पथकाने धाव घेवून पाहणी केली. पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी घटनास्थळी चौकशी केली. परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निता कायटे हे करीत आहेत.