जामनेर ( प्रतिनिधी ) – दोन मोटारसायकलींच्या समोरा – समोर झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे.
देऊळगाव गुजरी ते धामणगाव बडे दरम्यान रात्री हा भीषण अपघात झाला. समोरा-समोर दोन मोटारसायकलींची धडक झाली. या अपघातामध्ये देऊळगाव गुजरी येथील प्रवीण नामदेव माळी ( वय ४५) आणि त्यांचा मुलगा अतुल प्रवीण माळी ( वय १७) हे एका मोटारसायकल वरील बाप-लेक जागीच ठार झाले दुसर्या मोटारसायकलवरील विलास भगवान गव्हाळ (वय २८, रा. खेडी पन्हेरी, ता. मोताळा, जिल्हा बुलढाणा ) हा युवक देखील ठार झाला. देऊळगाव गुजरी येथील खालीद जमशेद तडवी हे जखमी झाले आहेत.
अपघात घडल्याची माहिती मिळाल्यानंतर देऊळगाव गुजरीसह परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. पहूरचे पोलीस निरिक्षक प्रताप इंगळे यांनी त्यांच्या सहकार्यांसह मयतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या खालीद तडवी यांना जळगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघतातात माळी पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याने देऊळगाव गुजरी परिसरावर शोककळा पसरली आहे.