नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – सीबीआयने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूली प्रकरणी ५९ पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. देशमुखांसोबत संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांच्यावरही आरोपत्र दाखल करण्यात आले आहे. लवकरच सुनावणी होणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांच्या आधारे केंद्रीय तपास संस्थेने २१ एप्रिल २०२१ रोजी देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला होता. २० मार्च २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात सिंह यांनी आरोप केला होता की, देशमुख यांनी सचिन वाजेसह काही मुंबई पोलीस अधिकाऱ्यांना मुंबईतील रेस्टॉरंट्स आणि बारमधून दरमहा १०० कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले होते.