पाचोरा ( प्रतिनिधी ) – सावखेडा येथील एका ४२ वर्षीय मजुराचा पाय घसरून नदीपात्रात पडल्याने मृत्यू झाला आहे. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सावखेडा येथील शंकर मोहन गोपाळ (वय – ४२) मजुरी करुन कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत होता. २ जुनरोजी सकाळी मजुरीसाठी जात असतांना येथील बहुळा नदी पात्रा नजीक शंकर गोपाळ यांचा पाय घसरून ते पाण्यात पडले. ही घटना एका लहान मुलाने ग्रामस्थांना कळविल्यानंतर ग्रामस्थांनी शंकर गोपाळ यास बाहेर काढून तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी त्यांना मृत घोषित केले. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयत शंकर मोहन गोपाळ यांचे पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, दोन मुली, एक भाऊ असा परिवार आहे.