मुंबई ( प्रतिनिधी ) – शरद पवारांसमोरही पक्षाचे भविष्य, नेतृत्व आणि विरासत कुणाकडे जाईल याबाबतचे प्रश्न आहेत. शिवसेनेच्या फुटीनंतर आता शरद पवार यांच्यासमोरही पक्ष फुटू नये यासाठी कठोर परीक्षेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा होते आहे.
शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी आणि पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जातील, याची कल्पना राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. हे प्रयत्न हाणून पाडण्याची रणनीतीही ठरले असल्याचे सांगितले जाते आहे. आता भाजपा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर लक्ष केंद्रित करेल असे सांगण्यात येते आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये कारवाई झाली ती राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच. अनिल देशमुख आणि नवाब मलिक काही महिन्यांपासून तुरुंगात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांची संपत्ती मनी लाँड्रिंग प्रकरणात जप्त करण्यात आलेली आहे. आयकर विभागाने, गेल्या वर्षी अजित पवार यांच्या नीकटवर्तीयांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापेमारीही केलेली आहे. हसन मुश्रीफ यांच्यावरही घोटाळ्यांचे आरोप करण्यात आले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा शिवसेनेसोबतच, राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही घेरत असल्याचे दिसते आहे.
अजित पवार यांचे नीकटवर्तीय धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री उशिरा फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती आहे. धनंजय मुंडे हे राज्यातील मोठे ओबीसी नेते आहेत. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा अशी त्यांची ओळख आहे. विरोधी पक्षात असतानाही त्यांचे फडणवीसांशी चांगले संबंध आहेत. मुंबईत नवे सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक नेते राष्ट्रवादीतून बाहेर पडण्यास वेळ लागणार नाही, असे सांगण्यात येते आहे. ईडी आणि केंद्रीय यंत्रणांचा दबाव पाहता, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीच टार्गेटवर असल्याचे स्पष्ट आहे, असे काही नेते खासगीत सांगत आहेत.
आता भाजपा पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर डाव खेळू शकते, अशी भीती अनेकांना वाटत आहेत. सध्या आयकर विभागाची नजर अजित पवारांवर आहे. त्यामुळेही हे घडण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत अद्याप उत्तराधिकारी कोण, हे ठरलेले नाही. याची स्पष्टता नसल्यानेही अजित पवार असे पाऊल उचलू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील हा छुपा संघर्ष असल्याचे सांगण्यात येते.काही प्रश्न असे आहेत की ज्याची उत्तरे शरद पवार यांच्याकडेच आहेत .