मुंबई (वृत्तसंस्था) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आणि हृतिक रोशन यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कंगनाने गतवर्षी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये हृतिक रोशनवर हल्लाबोल करताना त्याच्यावर थेट फसवणुकीचा आरोप लावला होता. तसेच कंगनाने हृतिक आणि आपल्यामध्ये काही ईमेल्सच्या माध्यमातून संवाद झाल्याचे देखील सांगितले. त्यावेळी थेट प्रसिद्धी माध्यमांसमोर कंगनाने हृतिकवर आरोप लावल्याने बॉलिवूडमध्ये मोठे वादंग देखील उठले होते.
दरम्यान, याच प्रकरणावरून अभिनेता हृतिक रोशनला मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवण्यासाठी गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकासमोर (सीआययू) हजर राहण्याचे समन्स बजावले होते. यानुसार हृतिक आज (दि. २७) आयुक्तालयाच्या कार्यालयात दाखल झाला आहे.
हृतिकवर आयपीसीच्या कलम ४१९ (व्यक्तीद्वारे फसवणूक) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६ सी (ओळख चोरी), ६६ डी (संगणक स्रोतांचा वापर करून व्यक्तीद्वारे फसवणूक) अंतर्गत सायबर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्री कंगना राणावतने दाखल केलेल्या तक्रारीसंदर्भात ही चौकशी केली जात आहे.
हृतिक रोशन आणि कंगना राणावत यांच्यात क्रिश सिनेमाच्या दरम्यान प्रेमसंबंध जुळले होते. मात्र पुढे या दोघांचं अफेयर आणि ब्रेक अप दोन्ही गोष्टी जगासमोर आल्या. या दोघांनी एकमेकांवर बरीच चिखलफेकही केली होती. दरम्यान, कंगना गेल्या महिन्या भरापासून कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रोलिंगची शिकार होत असल्याचे दिसून येत आहे.







