सोलापूर ( प्रतिनिधी ) – सासरच्या लोकांनीं विवाहितेचा छळ करून खून केल्याचा आरोप करीत संतप्त माहेरच्या मंडळींनी लेकीच्या मृतदेहावर सासरच्या घराच्या अंगणातच अंत्यसंस्कार केले. माढा तालुक्यातील मिटकलवाडी येथील अंजली हणमंत सुरवसे असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचे माहेर पंढरपूर तालुक्यातील उंबर पागे आहे.
अंजली सुरवसेचा विवाह २०१६ मध्ये मिटकलवाडीच्या हणमंत सुरवसेबरोबर झाला मात्र, आता गावातील एका विहिरीत अंजलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर माहेरच्या मंडळींनी सासरच्या लोकांवर खुनानंतर गुन्ह्याचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह विहिरीत टाकल्याचा आरोप केला. सासरच्या लोकांविरूध्द हुंडाबळीसह खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
अंजलीचा मृतदेह पाहून माहेरच्या मंडळींचा सासरकडील लोकांवरचा राग अनावर झाला. अंजलीचा मृतदेह त्यांनी तिच्या सासरी आणला आणि तेथे घरासमोरच अंगणात चिता रचून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यावेळी गावात तणावाचे वातावरण होते. पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.