जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावेत आणि जिल्ह्यातील मृत्यूदर १% खाली जावा याकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात ऑक्सीजन सुविधा असलेल्या १४० खाटांचे २८ सप्टेंबर रोजी लोकार्पण होणार आहे. त्याची पाहणी शनिवारी १९ रोजी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, आमदार सुरेश भोळे यांनी केली.


येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा कोविड रुग्णालयात रोटरी क्लब,सी.एस.आर. तसेच इतर संस्थांच्या मदतीने गेल्या महिन्यापासून १४० ऑक्सीजन खाटांच्या उभारणीचे काम सुरु होते. याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी वेळोवेळी पाहणी केली होती. या खाटांच्या उभारणीचे काम अंतिम टप्यात आले आहे. त्यामुळे त्याची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आ. भोळे आले होते. त्यांनी अडचणी जाणून घेत योग्य त्या सूचना दिल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक एन.एस.चव्हाण उपस्थित होते.








