२६ लाख २३ हजार रक्कमेच्या अंदाज पत्रकाला शासनाची मंजुरी

विश्वजीत चौधरी
जळगाव – येथील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून ईव्हीएम – व्हीव्हीपॅट मशीनच्या साठवणुकीसाठी आवश्यक असलेल्या गोदामाच्या दुरुस्तीसाठी राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी १९ नोव्हेंबर रोजी २६ लाख २३ हजार रक्कमेच्या अंदाज पत्रकाला मंजुरी दिली आहे.
जळगाव जिल्हा निवडणूक कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत अंदाजपत्रकाची छाननी करून तांत्रिक सहमतीसह तसेच मुख्य अभियंत्यांच्या शिफारशीसह २६ लाख २३ हजार ३९ रुपये रक्कमेचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. त्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. याबाबत १४ लाख, ७४ हजार,७२९ रुपयाचे आणि ११ लाख ४८ हजार ३१० रक्कमेच्या अशा अंदाजपत्रकास शासनाने अटींच्या आधींन राहून मान्यता दिली आहे. यात, दुरुस्ती करण्यात येणाऱ्या गोदामाचे बांधकामाची जबाबदारी जिल्हाधिकारी राहील त्यासाठी आवश्यकता भासल्यास ई-टेंडरिंग पद्धतीचा वापर करावा. गोदाम दुरुस्तीचे काम दर्जेदार करावे. या कामासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येणार नाही. काम सुरु करण्याआधी नमुना नकाशा, मांडणी नकाशा, विस्तृत नकाशाला वास्तुविशारदांकडून मंजुरी घेऊनच काम सुरु करावेत. आदी अटी शासनाने घातल्या आहेत.







