जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील गजानन कॉलनीतील महिलेची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.
कॉंग्रेस नारायण कुढेही ( वय २६ रा. पंडापदर, ता.रामपुर जि.कालाहंडी , ओरिसा ) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. त्याला शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
गजानन कॉलनीतील रहिवासी अनुपमा प्रभात चौधरी यांना केवायसी करण्यासंदर्भात अनोळखी इसमाचा फोन आला होता. संबंधिताने एक लिंक मोबाइलवर पाठवली तसेच आलेल्या ओटीपी क्रमांक मिळून अनुपमा चौधरी यांच्या बँक खात्यातून ऑनलाईन पध्दतीने दहा हजार रुपये काढुन घेतले होते. अनुपमा चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह कर्मचार्यांनी तांत्रिक माहितीच्या आधारावर तपास करत संशयित निष्पन्न केला. संशयित ओरिसा राज्यातील असल्याचे समोर आल्यानंतर पोलीस निरीक्षक रामदास वाकुडे यांनी संशयितांच्या शोधार्थ हे कॉ महेंद्र पाटील, पो ना सलीम तडवी, पो कॉ विकास पहुलकर यांचे पथक ओरिसा राज्यात रवाना केले.
संशयित ज्या भागात वास्तव्यास होता तो भाग नक्षली होता. कुणालाही संशय येऊ नये म्हणून पथकातील कर्मचार्यांनी तेथे वास्तव्यास असलेल्या लोकांप्रमाणेच पेहराव केला. व तपासाची चक्रे फिरवत संशयित काँग्रेस कुढेही याच्या मुसक्या आवळल्या. अटक करून त्याला गुरुवारी जळगावात आणण्यात आले.