बारामती (प्रतिनिधी) – बारामती लोकसभा मतदारसंघावर भाजपाचा विशेष जोर आहे. गेल्या दीड वर्षांपासून त्यांची टीम बारामतीत तळ ठोकून आहे. दर सहा महिन्यागणिक सर्व्हे केले जात आहेत. सुरूवातीला बारामती मधून भाजपाचे उमेदवार म्हणून हर्षवर्धन पाटील यांचे नाव आघाडीवर होते. पण आता एकनाथ शिंदेच्या बंडानंतर समीकरणे बदलली आहेत. शिंदे गटात प्रवेश केलेल्या विजय शिवतारे यांची पुणे जिल्ह्यावरील पकड पाहता त्यांना लोकसभेचे तिकीट देण्याचे निश्चित झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यानुसार ते तयारीलाही लागले आहेत.
पवारांचा बालेकिल्ला बारामती लोकसभा मतदारसंघ काबिज करण्यासाठी भाजपाने कंबर कसली असून, सुप्रिया सुळे यांना तुल्यबळ लढत देण्यासाठी नवनव्या रणनीती आखल्या जात आहेत. शिवतारे यांनी बारामतीचा दाैरा करत पवारांना आव्हान दिले आहे. शिवाय वेळोवेळी लोकसभा निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे संकेत दिले आहेत. शिवतारे यांनीही, केंद्र व राज्य सरकारची कामे लोकांपर्यंत नेणार आणि जनतेमध्ये शिवसेनेची ताकद वाढविणार, असे सांगत लोकसभेसाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे विजय शिवतारे यांचे तिकिट जवळपास निश्चित झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत.
बारामती लोकसभा मतदारसंघात दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि खडकवासला अशा सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यापैकी चार मतदारसंघांत महाविकास आघाडीचे आमदार आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांचे पारडे जड आहे.