कल्याण (वृत्तसंस्था) – कल्याण डोबिंवलीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांनी प्रशासनाची चिंता वाढवली आहे. नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हीच संख्या रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त प्रत्यक्ष फिल्डवर उतरुन कामाला लागले आहेत.


नागरिक आणि दुकानदार नियम पाळत करत आहेत की नाही हे पाहण्यासाठी केडीएमसी आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी हे बाजारात गेले. दुकानात जाऊन त्यानी परिस्थितीचा आढावा घेतला. अजूनही काही दुकानदार मास्क वापरत नाहीत हे दिसून आल्यानंतर त्यांच्या विरोधात आयुक्तांनी दंडात्मक कारवाई केली. तसंच जे नागरिक यापुढे नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधत असाच कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
गेल्या दोन दिवसांपासून कल्याण-डोंबिवलीत कोव्हिड रुग्णांची संख्या 100 च्या वर आढळून आली आहे. तसंच कोरोना संसर्ग काळातपासून आतापर्यंत जवळपास 62 हजार रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 1152 रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. आहे. आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कंबर कसली आहे.
कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे. शासनाने घालून दिलेले नियम नागरिकांनी पाळायला हवेत. जर नियम पाळले तर लॉकडाऊनची गरज भासणार नाही. लोकांनी गांभीर्य ओळखून नियम पाळावेत आणि कोरोनापासून लांब रहावं, असं आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले.
महापालिका क्षेत्रात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. ही रुग्ण संख्या नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विविध उपाययोजना राबवण्याबाबतचे आदेश महापालिका अधिकाऱ्यांना दिले आहेमहापालिका क्षेत्रातील प्रभागक्षेत्रअंतर्गत कोविड रुग्ण ज्या इमारतीमध्ये आढळून आला आहे ती इमारत प्रतिबंधित / सील करावी, विना मास्क तसेच मास्क व तोंड झाकेल असा मास्क ज्यांनी परिधान केला नाही अशा नागरिकांवर पोलिस विभागाच्या मदतीने दंडात्मक कारवाई करावी.
मॉल, भाजी मंडई, व्यापारी, दुकाने व इतर सार्वजनिक ठिकाणी येथील सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या व विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करावी,मंगल कार्यालये, बँकेट हॉल इत्यादी ठिकाणी लग्नसमारंभासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास व मास्क व सोशल डिस्टंसिंगचे पालन होत नसेल तर सदर अस्थापनांवर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कारवाई करावी.
त्याचप्रमाणे रेस्टॉरंट/ हॉटेल/ उपाहारगृहे/मद्यालये इ 50 टक्के क्षमतेने सुरू असल्याची तपासणी करून सदर नियमांचेच पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास त्या आस्थापनावर दंडात्मक कारवाई करून आस्थापना सील करण्याची कार्यवाही करावी. असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सर्व प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना दिले आहेत.







