नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने त्याचे पालन आणि मदत करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्य सरकार आणि मुंबई पोलिसांना मोठा झटका बसल्याचे मानण्यात येत आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयानं सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी निकाल दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणेंनी ट्विट करून निशाणा साधला आहे. ‘अब बेबी पेंग्विन तो गयो!!! इट्स शो टाईम!’ अशा आशयाचे ट्विट नितेशज राणे यांनी केले आहे. तसेच त्यांनी ट्विटमध्ये जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत हा हॅशटॅगदेखील वापरला आहे.
तसेच, राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांनीदेखील आनंद व्यक्त केला असून, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. पार्थ यांनी सत्यमेव जयते.., असं ट्विट केलं आहे. सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयनं करावा, अशा मागणीचं पत्र पार्थ यांनी गेल्या काही दिवसापूर्वी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिलं होतं.
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज आहे’ असे मत व्यक्त केले.
हिंदी चित्रपटसृष्टीतील तरुण आणि हरहुन्नरी अभिनेता म्ह्णून सुशांत सिंग राजपूत कडे पहिले जात होते. वयाच्या 34 व्या वर्षी मुंबईतील आपल्या राहत्या घरी गळफास लावून सुशांतने आत्महत्या केली. त्याचे निधन जितके दुःखदायक होते, तितकेच ते धक्कादायकही होते. अद्याप सुशांतने आत्महत्या नेमकी का केली याचा तपास पोलीस करत आहेत.