फैजपूर ( प्रतिनिधी ) – फैजपूर तालुक्यातील दुसखेडा शिवारातील शेतातील पत्र्याच्या शेडमधून अज्ञात चोरट्यांनी गहू व कापूस चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फैजपूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन दयाराम सोनवणे (वय – ३८) रा. दुसखेडा, ता. यावल हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतातील सामान ठेवण्यासाठी त्यांच्या शेतात पत्र्याचे शेड आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता पत्र्याचे शेडला कुलूप लावून ते घरी गेले होते. अज्ञात चोरट्यांनी पत्र्यांच्या शेडमध्ये ठेवलेला १० क्विंटल गहू आणि ३ क्विंटल कापूस असा एकुण ५५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल पत्र्याचे शेड तोडून चोरून नेल्याचे समोर आले आहे. शेतकरी नितीन सोनवणे हे सोमवारी १८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता शेतात गेले त्यावेळी त्यांना पत्र्याचे शेडचे कुलूप तोडलेले दिसून आले. आत जावून पाहणी केली असात गहू आणि कापूस चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सोमवारी १८ एप्रिल रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक महेश वंजारी करीत आहे.