मुंबई (वृत्तसंस्था) – रेमडेसिविरच्या साठेबाजीप्रकरणी मुंबई पोलिसांनी ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा नेत्यांनी रात्रीच पोलीस स्टेशन गाठले आणि संताप व्यक्त केला. यावरून भाजपवर सर्वच स्तरातून टीका होत असून राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळाले. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

रोहित पवार म्हणाले कि, ब्रूक फार्मा कंपनीच्या कर्मचाऱ्याला रेमडेसीवीरचा काळाबाजार केल्यावरून वलसाड पोलिसांनी अटक केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. पण याच कंपनीच्या संचालकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं तेंव्हा त्यांना सोडवायला राज्याचे विरोधी पक्षनेते मध्यरात्री पोलीस ठाण्यात दाखल झाले.
आजवर जनतेच्या कल्याणासाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याने पाहिले. पण आज महाराष्ट्राची जनता अडचणीत असताना या जनतेच्या कल्याणासाठी भांडण्याऐवजी काळाबाजार करणाऱ्या कंपनीसाठी भांडणारे विरोधी पक्षनेते राज्याला पहायला मिळतायेत, हे खेदजनक आहे, अशी खंत रोहित पवारांनी व्यक्त केली.
ज्या जनतेने ५ वर्षे राज्याची सत्ता विश्वासाने त्यांच्याही हाती दिली होती, याचीतरी जाणीव ठेवून राज्याची अडवणूक न करता आवश्यक ती औषधं केंद्र सरकारच्या माध्यमातून भाजपने राज्याला उपलब्ध करून द्यावीत. मग नेहमीप्रमाणे भले त्यांनी याची जाहिरात करून राजकीय भांडवल केलं तरी हरकत नाही, असा टोलाही पवारांनी भाजपला लगावला.
करोना संपल्यावर प्रत्येक गोष्टीचं राजकारण करायला तुम्ही मोकळे आहातच, पण आजही तुम्हाला राजकारणच करायचं असेल तर तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. आम्ही मात्र लोकांचे जीव वाचवण्याचा आमच्यापरीने पूर्ण प्रयत्न करतच राहू, अशी रोहित पवार यांनी म्हंटले आहे.







