अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांचा रोष ; पोलिसांकडून बळाचा वापर
जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ येथे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत नियोजित दोऱ्यानंतर निघत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीला रोखण्याचा प्रयत्न केला यावेळी कार्यकर्ते मानस शर्मासह काही कार्यकर्ते उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या कारला धडकले. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु विद्यार्थांचा रोष बघून यावेळी पोलिसांनी बळाचा वापर केला. यात तीन ते चार कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहे. तसेच ठाकरे सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उदय सामंत राजीनामा द्या अश्याही घोषणा या ठिकाणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आल्या. ना. उदय सामंत विद्यार्थ्यांना न भेटता निघून गेल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकारकर्त्यांना या प्रकारचा राग आल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश सहमंत्री सिद्धेश्वर लटपटे यांनी सांगितले की उदय सामंत यांनी भेटायला वेळ दिली नाही अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी देखील तुम्हाला भेटू देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र ना. उदय सामंत न भेटता निघून गेल्याने नाईलाजास्तव आमच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाच्या मुख्य गेट समोर यावेळी ठिय्या मांडला होता. त्यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी होता. तसेच नंतर कुलगुरूंचीही गाडी अडविण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. पुढील चौकशी पोलीस करीत आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विराज भामरे, सोहम पाटील, आदेश पाटील, आदित्य नायर, पवन भोई, रितेश चौधरी, सिद्धेश्वर लटपटे,रिद्धी वाडेकर आंदोलनात सहभागी होते.