जळगावच्या ९ योध्यांचा समावेश

विश्वजीत चौधरी
जळगाव – कोविड संसर्ग आजारामुळे कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास विमा कवचचे रक्कम अदा करण्यासाठी एका आठवड्याच्या आत प्रस्ताव पाठवावे असे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागाकडून राज्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना बुधवारी १८ नोव्हेंबर रोजी देण्यात आले आहेत. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेचे एकूण ९ अधिकारी,कर्मचाऱ्यांचे कुटुंब पात्र असून त्याबाबतचे अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना यापूर्वीच देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाचे अवर सचिव विजय चांदेकर यांनी आदेश पारित केले आहेत. त्यात म्हटले आहे की, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सी.एस.सी. कंपनीचे केंद्र चालक, कार्यरत असलेले कंत्राटी कर्मचारी तथा कामगार यांना ३० सप्टेंबर २०२० पर्यंत ५० लाखाचे विमा कवच देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील कर्तव्य बजावताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यास विमा कवचचे रक्कम अदा करण्यासाठी एका आठवड्याच्या आत प्रस्ताव पाठवावे असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पारित केले आहे.
जळगाव जिल्हा परिषदेने यापूर्वीच ९ कोरोना योध्यांच्या मदतीसाठी त्यांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहेत, अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे यांनी ” केसरीराज ” शी बोलतांना दिली. तर मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील म्हणाले की, कोरोना योध्यांच्या सेवेचा उचित सन्मान व्हावा व त्यांच्या परिवाराला शासकीय मदत मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठविले आहे. आजही जे कर्मचारी, अधिकारी कोरोना विषाणू निर्मूलनासाठी काम करीत आहेत, त्यांचे कार्य अमूल्य आहे, असेही ते म्हणाले.
लाभार्थी कोरोना योध्यांमध्ये भडगाव उपकेंद्राचे आरोग्यसेवक मोहिनीराज रघुनाथ पाटील, रावेर तालुक्यातील खानापूर प्राथमिक शाळेचे शिक्षक अनिल लिलाधर नेहेते, जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील अंगणवाडी मदतनीस मुशफाबी युसुफिया देशमुख, पाचोरा तालुक्यातील वारखेडीच्या अंगणवाडी मदतनीस मंगलाबादी गणपत पाटील, चोपडा तालुक्यातील लासूरच्या अंगणवाडी सेविका लीलाबाई भालचंद्र पाटील, जामनेर तालुक्यातील वाकडीचे ग्रामसेवक नरेंद्र भिवसन बावा, भडगाव तालुक्यातील गिरडच्या अंगणवाडी सेविका जयश्री तुळशीराम पाटील, चोपडा तालुक्यातील वैजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक (हिवताप) नरेश रमेश बारेला, यावल पंचायत समितीचे कनिष्ठ सहायक हमीद जोहराबक्ष तडवी यांचा समावेश आहे.







