पाचोरा (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक पार पडली. या निवडणुकीच्या निकालाच्या वेळी तीन जागांच्या बाबतीत निवडणुक निर्णय अधिकारी यांनी सदोष व राजकीय दबावात कामकाज केले व विद्यमान आमदारांच्या पॅनलला सहाय्य करीत काही निकाल जाहीर केले, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाच्या वैशाली सूर्यवंशी यांनी केली आहे. तसेच आम्ही लवकरच जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढणार आहोत, अशीहि माहिती त्यांनी दिली.
निकालविरोधात जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे इलेक्शन पिटीशन दाखल केलेले आहे. असे असतांना जिल्हा उपनिबंधकांनी त्यावर पक्षकारांना नोटीस देखील काढलेली नाही. मात्र आमदारांचे कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या अपात्रता प्रकरणात उच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली असतांनाही तातडीने नोटीस काढुन तडकाफडकी आमच्या पॅनलचे उमेदवार उध्दव मराठे यांना अपात्र घोषीत करण्यासाठी सलगच्या व जवळच्या तारखा देऊन पक्षपात करीत आहेत.
अपात्रता अर्जावर पक्षाकारांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पुरेसा अवधी न देता घाईघाईत सलगच्या तारखा देऊन जिल्हा उपनिबंधक यांनी आपली सत्ताधाऱ्यांशी असलेली बांधीलकी जगाला दाखवुन दिलेली आहे, असेही वैशाली सूर्यवंशी यांनी सांगितले.
नैसर्गिक न्यायतत्वाने न वागणाऱ्या जळगाव जिल्हा सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधक बिडवाई यांचा जाहीर निषेध आम्ही करीत आहोत. तसेच जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दाखल असलेल्या इतर तक्रारी व त्याचे चौकशीच्या प्रकरणात अद्याप चौकशी न करता प्रकरणे प्रलंबीत ठेवलेली आहेत. त्याची साधी चौकशी देखील केलेली नाही. अशा प्रकरणांच्या जिल्हा उपनिबंधक श्री बिडवाई यांची चौकशी करण्याची देखील मागणी आम्ही करीत आहोत. तसेच आम्ही लवकरच जिल्हा उपनिबंधक यांना घेराव घालण्यासाठी मोर्चा काढणार आहोत, असेही त्या म्हणाल्या.