जळगाव (प्रतिनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या मुख्य गेट समोर २ जणांवर प्राणघातक हल्ला झाला. यामध्ये २७ वर्षीय तरूणाला कोयता, चॉपर आणि लाकडी बल्ल्यानी सपासप वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे तर दुस-या इसमाने जीव मुठीत धरून रुग्णालयात पळ काढल्यामुळे त्याचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेमुळे रुग्णालयाच्या आवारात एकच धावपळ उडाली होती.
सुरेश विजय ओतारी (वय २८) आणि अरुण भीमराव गोसावी (वय ४७) दोन्ही रा.तुकाराम वाडी हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये उपचाराकामी आले होते. यावेळी रुग्णालयाच्या बाहेर गेल्यावर गेटच्या समोरच त्यांच्यावर भूषण माळी व अन्य पाच ते सहा जणांनी धारदार कोयता, लाकडी बल्ल्या व अन्य धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
अधिक माहिती घेतली असता सकाळी ११ वाजता तुकारामवाडीत दोन जणांचे वाद झाले होते. त्याचे पर्यावसन संध्याकाळी पाच वाजता या प्राणघातक हल्ल्यात झाले, अशी माहिती मिळाली आहे. सुरेश ओतारी व अरुण गोसावी यांच्यावर वार झाले, त्यावेळी रुग्णालयाजवळ पळापळ झाली. स्वतःला सोडवून अरुण गोसावी यांनी रुग्णालयात धावत जात पळ काढला तर सुरेश ओतारी मात्र हल्लेखोरांचा तावडीत सापडला. त्याच्यावर उजव्या कानाच्या मागे, डाव्या कानाच्या मागे, डाव्या खांद्यावर, डाव्या पोटाजवळ आणि पार्श्वभागावर धारदार शस्त्राच्या वार झालेले आहेत.
जखमी अवस्थेतच सुरेश ओतारी हा रुग्णालयात गेला. त्याच्या सुरक्षारक्षकांनी त्याला आधार देत अत्यावश्यक शस्त्रक्रिया गृहात नेले. तेथे वैद्यकीय पथकाने त्याच्यावर उपचार केले. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी माहिती मिळताच सुरेश ओतारीचे नातेवाईक रूग्णालयात आले होते. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी अरुण गोसावी याचा शोध घेतला असता ते रक्तपेढीमध्ये घाबरलेल्या अवस्थेत जीव वाचविण्यासाठी लपून बसलेले आढळून आले. त्यांना धीर देत रुग्णालयात आणून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.अरुण गोसावी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली आहे. त्याने स्वतःच्या बचावासाठी मारेकऱ्यांकडून हिसकावून आणलेला लाकडी दांडा देखील पोलिसांनी रक्तपेढीजवळून ताब्यात घेतला आहे.
जिल्हापेठ पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरू होते.