मुंबई (वृत्तसंस्था) – गेल्या १ वर्षांपासून कोरोनानं जगभरात थैमान घातलं आहे. या कालावधीत अनेकांना कोरोनाची लागण झाली तर काही जणांनी यामुळे आपले प्राणही गमावले. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे.

‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.’ असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून करोना रुग्णसंख्या वाढत आहे. गेल्या आठवड्यात 1,300 च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता 1,700 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही 4.6 टक्क्यांवरून 12 टक्क्यांवर गेला आहे.







