अमळनेर (प्रतिनिधी) – नीम येथून अमळनेर बसमध्ये दारु पिऊन बसच्या मागील सीटवर जाऊन झोपणाऱ्या एकाला तिकीट काढण्यासाठी महिला वाहकाने विचारल्यावर त्यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून नोकरीवरून कमी करण्याची धमकी दिली असून सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून याप्रकरणी मारवड पोलिस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अमळनेर बस डेपो येथे कार्यरत असलेल्या महिला वाहक यांनी मारवड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, भगवान राजेंद्र पाटील रा. नीम हल्ली मुक्काम सुरत हा नीम येथून बसमध्ये अमळनेर जाण्यासाठी बसला. मात्र तिकीट न घेता बसच्या मागील सीटवर जाऊन झोपून गेला. महिला वाहकाने कळमसरे गावाच्या पुढे बस आल्यावर त्यास तिकीट काढण्याबाबत विचारले असता त्याने अश्लील शिवीगाळ करून नोकरीवरून कमी करण्याची धमकी देत तिकीट घेतले नाही. सरकारी कामात अडथळा आणून महिला वाहकाला धमकी दिल्याने मारवड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुनिल तेली करीत आहे.