पुणे (वृत्तसंस्था) – बनावट कागदपत्रे सादर करून बँकेची 13 लाख 55 हजार रूपयांची फसवणूक केल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हे शाखेने तब्बल 22 वर्षांनंतर अटक करण्यात आली आहे. संदीप सुधाकर धायगुडे (वय 53, रा. सदाशिव पेठ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

बँकेची फसवणूक करून फरार झालेल्या आरोपीची माहिती पोलीस कर्मचारी सचिन ढवळे यांना मिळाली. चतुःश्रुंगी येथील फसवणुकीच्या गुन्ह्यात 22 वर्षांपासून फरार असलेला आरोपी कोथरूड येथील शिवतीर्थनगर येथे भाड्याने राहत होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धायगुडेला अटक केली. आरोपीचे दोन साथीदार आनंद प्रभाकर गोरे व सुब्रतो दास हे दोघेही फरार असून ते सध्या परदेशात आहेत.
धायगुडे गुन्हा केल्यानंतर वेगवेगळ्या शहरात राहत होता. 2013 मध्ये तो पुण्यात आला होता. त्यानंतर अधून-मधून येणे जाणे सुरू होते. तो सध्या ट्रेडींगची कामे करत होता. याप्रकरणी अटक केल्यानंतर त्याला चतुःश्रुंगी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह, सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे, पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, पोलीस उपनिरीक्षक शशिकांत शिंदे, दीपक माने, सचिन ढवळे, रुपेश वाघमारे, दत्तात्रय फुलसुंदर यांच्या पथकाने केली.







