नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवर या विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. पण, नागरिकांकडून अनेक ठिकाणी नियमांची पायमल्ली होत आहे, ज्यामुळं कोरोनाची ही भयावह परिस्थिती काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहे.

महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये कोरोना चा सर्वाधिक फटका बसला. आता हाच संसर्ग इतरही राज्यांमध्ये अतिशय वेगाने पसरताना दिसत आहे. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगालमधील परिस्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. त्यामुळे मोदी सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.
केंद्रानं त्यासंदर्भातील तयारी केली असून, दिल्लीत त्यासाठीच्या घडामोडींना वेग आला आहे. देशात मागील 24 तासांत कोरोनाचे 2,61,500 नवे रुग्ण आढळले, तर 1,501 जणांचा मृत्यू केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे या बैठकीला उपस्थित होते. बहुतांश राज्याचे आरोग्य मंत्री, प्रशासनातील आयएएस दर्जाचे अधिकारी आणि उच्च पदस्थदेखील बैठकीला हजर होते . देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून, लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीत उमटला. तशी मागणी जवळपास सर्वच राज्यांकडून करण्यात आली. त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळं नागरिकही सावध होऊ लागले आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रात शनिवारी सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मागील 24 तासांत तब्बल 67 हजार 123 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. तर, 56 हजार 783 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 30 लाख 61 हजार 174 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात 419 रुग्णांचा आज मृत्यू झाला. आतापर्यंत एकूण 59 हजार 970 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 6लाख 47 हजार 933 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.18 टक्के झाले आहे.







