भुसावळ (प्रतिनिधी) – शेतीची नोंद सातबारा उताऱ्यावर घेण्यासाठी तक्रारदाराकडून १२ हजाराची लाच घेतांना कोतवालासह एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. या घटनेमुळे महसूल पथकात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे राहणाऱ्या तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. तक्रारदार यांनी सन २०२२ मध्ये भुसावळ मधील कुऱ्हे पानाचे या गावात स्वतःच्या नावे 2 एकर. शेतजमीन विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तक्रादार यांचे स्वतःचे नावं लावण्यासाठी त्यांनी तलाठी कार्यालय कुऱ्हे पानाचे येथे नांव लावणेसाठीचे अर्ज केला होता. प्रकरणात भुसावळ मंडळ अधिकारी योगिता पाटील यांनी त्यात त्रुटी काढून तक्रारदार यांना भुसावळ तहसील कार्यालयाचे कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटण्यास सांगितले होते.
तक्रारदार कोतवाल रवींद्र धांडे यांना भेटले. कोतवाल यांनी तक्रारदार यांना मी तुमचे काम मंडळ अधिकारी योगिता पाटील यांच्या कडून करून आणतो. सातबाराच्या उताऱ्यावर नावं लावण्याच्या मोबदल्यात मंडळ अधिकारी यांचे नाव सांगून कोतवाल धांडे यांनी १५ हजार रुपयांची लाच मागणी केली. त्याबाबत तक्रारदार यांनी दिनांक १८ एप्रिल रोजी तशी तक्रार दिल्यावरून आज मंगळवार रोजी पंचासमक्ष पडताळणी कारवाई केली.
यातील कोतवाल धांडे यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांच्याकडे प्रथम १५ हजार रुपयाची मागणी करून तडजोडीअंती १२ हजार रुपयाची लाच रकमेची मागणी केली. रक्कम खाजगी इसम हरिष देविदास ससाणे, (वय-४४ वर्ष, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) देण्यास सांगितले. खाजगी इसमाने पंचासमक्ष स्वीकारले असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले. वर नमूद दोन्ही इसमा विरुद्ध भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.
कारवाई पो. नि. संजोग बच्छाव, स.फौ.दिनेशसिंग पाटील, पो.ना.बाळू मराठे, पो.कॉ.प्रदिप पोळ, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल पाटील, पो.कॉ.राकेश दुसाने , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर यांनी केली.