असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे यांचे प्रतिपादन
जळगाव (प्रतिनिधी) – ” वेदनेचा वेद करून जगणारे वंचित गोरगरीब कृतिशील अबोल तत्वज्ञानीच आहेत. “असे भावोद्गार असोदा केंद्रप्रमुख भगवान वाघे यांनी काढले. उपक्रमशील शिक्षकांनी सुरू केलेल्या भारतरत्न डॉ .ए .पी .जे अब्दुल कलाम पुस्तक भिशी उपक्रमांतर्गत बालदिनानिमित्ताने दि.१५ ऑक्टोबरच्या सायंकाळी पूज्य साने गुरुजींच्या ‘ खरा तो एकची धर्म ‘ या मानवता भावनेतून दीनदलितांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आला त्याप्रसंगी वाघे बोलत होते. अध्यक्षस्थानी निवृत्त माध्यमिक उपाशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर असून प्रमुख अतिथी शिक्षणतज्ज्ञ चंद्रकांत भंडारी, ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प.मनोहर खोंडे उपस्थित होते .
मेहरुण तलावा जवळील कागदी फुले विक्रेते तसेच कालिका माता मंदिराच्या हायवेलगतचे उतारकरुंच्या सुमारे ७५ कुटुंबातील बालकांना कुटूंबियांसह लाडू, करंजी,शंकरपाळे, शेव चिवडा हा दिवाळी फराळ मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.वंचित बालकांच्या चेहऱ्यावरील आनंद तत्वज्ञानाची पुस्तक वाचण्यापेक्षा जास्त अंतर्मुख करतो अशा भावना मार्गदशनातून भिशी समन्वयक विजय लुल्हे यांनी व्यक्त केल्या. अध्यक्षीय समारोपात निवृत्त उपशिक्षणाधिकारी सिद्धार्थ नेतकर यांनी बालदिनाच्या औचित्याने शिक्षकांनी सामाजिक उत्तरदायित्वातून वंचित गोरगरीब बालकांसोबत दिवाळी साजरी केल्याबद्दल गौरवोद्गार काढले .
भिशी सभासदांनी सदरहू उपक्रम “वाचनानंद ते सेवानंद ” या ध्येयाने निवृत्त शिक्षणाधिकारी नीळकंठ गायकवाड व निवृत्त शिक्षण उपसंचालक साहित्य शशिकांत हिंगोणेकर यांच्या प्रेरणेने व गटशिक्षणाधिकारी सतीश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी प्रतिमा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे राबविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी, ज्येष्ठ पत्रकार दीपक महाले, जनमत प्रतिष्ठानचे पंकज नाले, कलाध्यापक संघाचे निलेश चौधरी, शिरीष चौधरी, उषा सोनार, सिंगर ज्योती राणे, संगीता माळी, आशा साळुंखे, प्राचार्य राजेंद्र महाजन, डॉ.विजय बागुल, डॉ.विपुल मोरे, अभियंता संजय भावसार यांचे सहकार्य मिळाले. आभार प्रदर्शन सुदाम बडगुजर यांनी केले.