दिनेश पालवे
अमळनेर – अमळनेर तालुक्यातील अनोरे गावाला केंद्रीय जलमंत्रालयाचा सन २०१९ चा राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे पत्र नुकतेच अमळनेर पंचायत समितीला प्राप्त झाले आहे. यामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
ज्या गावाला वर्षभर पाण्याचा टँकरने पाणी पुरवठा व्हायचा , ती ओळख पुसुन टाकण्यासाठी सर्व अनोरेवासीय एकत्र आले. एकजूट दाखवत त्यांनी गावाचा विकास करायचे ठरविले. त्यात माजी जिल्हापरिषद सदस्य संदीप पाटील यांनी गावाला प्रेरणा दिली. गावात १६ मार्च २०१९ ला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. गुरुकुल प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुकाराम पाटील, बाजीराव पाटील, खुशाल पाटील यांनी व गावातील सर्व ग्रामस्थांनी मदत केली. त्या ग्रामसभेस अमळनेरच्या तत्कालीन तहसीलदार ज्योती देवरे यांनीही मार्गदर्शन केले. ग्रामसभेतच ३ लाख रुपये जमा झाले. त्यांना पाणी फाऊंडेशन बरोबर विविध पर्यावरण चळवळ, पर्यावरण तज्ञ यांची साथ मिळाली.
गावतील सर्व नागरिक एकत्र आले. त्यात गावातील सर्व भूजलपातळी वाढविणे, प्रत्येक घराजवळ शोषखड्डा तयार करणे व झाड लावणे , प्रत्येक घराला सारखा रंग लावणे, शेततळी तयार करणे, सामुहिक श्रमदान करणे,एकाचवेळी मतदान करणे, प्रत्येक घरावर राष्ट्रीय संदेश लिहिणे, पक्षांसाठी पाणी व दाण्याची व्यवस्था करणे, गावतील प्रत्येक वाहनावर पाणीदार अनोरे नाव व सिम्बॉल टाकणे, रेनवाटर हार्वेस्टींग करणे असे विविध उपक्रम सुरु झाले.यामुळे अनोरेवासीयांनी पाणी टंचाईवर मात केली. सर्व उपक्रमांची दखल भारत सरकारच्या जलमंत्रालयाने घेतली .केंद्रीय भूजल बोर्डाच्या वैज्ञानिक आतिरा आर.यांनी अनोरे गावात येउन प्रत्येक उपक्रमाची पाहणी केली आहे. अमळनेर तालुक्यातील आनोरे गावाला मिळालेल्या या जलमंत्रालयाच्या पुरस्काराची अमळनेर तालुक्यात एकच चर्चा आहे.
पुरस्कारामुळे तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून भविष्यात गावात “नो व्हेईकल डे” ही संकल्पना राबविली जाईल.
नरेंद्र पंडीत पाटील, माजी उपसरपंच, अनोरे.