मुंबई (वृत्तसंस्था) – कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना केंद्र सरकारकडून लसींच्या पुरवठ्यावरून राजकारण केल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. राष्ट्रवादी व भाजपमधील नेत्यांमध्ये सध्या ‘मुंबई मॉडेल’वरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केंद्र सरकारच्या कारभाराचा समाचार घेत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच टीका केली आहे. ‘घरात नाही दाणा पण मला ‘वॅक्सिन गुरू’ म्हणा,’ अशा शब्दात चाकणकरांनी ट्विट केलं आहे.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर सारखे टीकास्त्र सोडले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केल्यानंतर आता लसी वाटपाच्या मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकरांनी थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. ‘घरात नाही दाणा पण मला ‘वॅक्सिन गुरू’ म्हणा… भारतीय नागरिकांना लसीकरणापासून वंचित ठेवून केंद्र सरकारने जगभरात या लसी फुकट वाटल्या. केंद्र सरकारच्या पापाचं फळ जनतेला भोगावं लागत आहे. या पापाचं प्रायश्चित्त भाजपला करावंच लागेल.’ असं चाकणकरांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांनी यापूर्वीही केंद्र सरकारवर टीका केली होती. बक्सर जिल्ह्यातील चौसामधील महादेव घाटाच्या परिसरात उत्तर परदेशातून सुमारे १०० हुन अधिक मृतदेह वाहून आल्याची घटना घडल्यानंतर या घटनेवरून चाकणकर यांनी भाजपवर हल्लाबोल केला होता.
बिहारमध्ये गंगा नदीत 100 पेक्षा जास्त प्रेतं तरंगताना आढळल्यानंतर हीच घटना महाराष्ट्रात घडली असती तर भाजपने आकाश पाताळ एक केलं असतं. दोन चार मंत्र्यांचे राजीनामे मागितले असते, राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असती. मृत्यूचं भांडवल करणं त्यांनाच जमतं. असं म्हणत चाकणकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मृतदेहांचा पडलेला खच यांचा फोटो ट्विटरवर टाकला होता.