मुंबई(वृत्तसंस्था) – राम मंदिर न्यासाच्या अयोध्येतील एका जमीन खरेदीवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या वर्गणीच्या मुद्द्यावरून शिवसेनेने टीका केली. या टीकेनंतर काल सेनाभवनासमोर भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. सेनाभवनासमोरील राड्यानंतर शिवसेनेनेचे कट्टर वैरी असलेल्या नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे यांनी ट्विट करत शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेला पुन्हा डिवचले आहे.
‘सेनाभवनासमोर भिडणाऱ्या शिवसैनिकांना जाऊन सांगा की, तुमचा उद्धव आमच्या मोदी साहेबांसमोर नाक घासून आला आहे. मग तुम्ही कोणाच्या जोरावर छाती फुगवत आहात’, असं ट्विटमध्ये नितेश राणे म्हणाले. तसेच भाजपाच्या मुंबईतील कार्यकर्त्यांना मानले, अशा शब्दात नितेश राणे यांनी सेनाभवनसमोर शिवसैनिकांशी भिडणाऱ्या भाजपाच्या कार्यकर्त्यांचेही नितेश राणे यांनी कौतुक केले आहे.