मुंबई (वृत्तसंस्था) – महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज 79 वा वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राजभवनावर दाखल झाले. मुख्यमंत्र्यांनी पुष्पगुच्छ देऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले. सत्तेत आल्यापासून राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी सरकार असे चित्र पाहायला मिळत होते. त्यात मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात पत्रावरुनही संघर्ष झालेला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राज्यपालांची भेट घेऊन हा तणाव काहीसा निवळण्याचा प्रयत्न केला, असे मत राजकीय विश्लेषक मांडत आहेत.







