उज्जैन (वृत्तसंस्था) – जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला भारतामध्ये शनिवारी सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमध्ये पाच वेगवेगळ्या सेंटरवर या अभियानाची सुरुवात झाली आहे. या वर्षातील हे सर्वात महत्त्वाचं अभियान आहे. लसीकरण अभियान सुरु झाल्यानंतर 24 तासांच्या आत येथील हॉस्पिटलमधील 3 नर्सची तब्येत बिघडली आहे.

कोरोना लस घेतल्यानंतर हॉस्पिटलमधील तीन नर्सची तब्येत बिघडली. राणी, महिमा आणि सुमन बहारिया असं त्यांच नाव आहे. त्यांना उलटी, जुलाब, श्वास घेण्यास अडथळा हा त्रास होत असल्याची माहिती आहे. हा त्रास होताच त्यांना सुरुवातीला जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. उज्जैनमधील जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांच्या टीमनं या तीन्ही नर्सची तपासणी केली. या तपासणीच्या नंतर त्यांना घरामध्येच आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
या तिघींमधील राणी या नर्सची तब्येत गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना ताप आला असून श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्या बैतूलच्या रहिवाशी आहेत. कोरोना लस घेतल्यानंतर अर्धा तासाच्या ऑब्झर्वेशन कालावधीमध्ये काही झालं नाही म्हणून त्या परत कामावर रुजू झाल्या होत्या. त्यानंतर दुपारी त्यांना त्रास सुरु झाला. संध्याकाळी तो त्रास आणखी वाढला. महिमा यांना जुलाब आणि ताप आला असल्याची माहिती आहे.
”लसीकरणानंतर ताप येणं ही सामान्य प्रक्रिया आहे. या सर्व नर्सवर पूर्ण उपचार सुरु आहेत, घाबरण्याची गरज नाही,” अशी प्रतिक्रिया जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मध्य प्रदेशात पहिल्या टप्प्यात 4 लाख 16 हजार जणांना लस टोचवण्यात येणार आहे. यापैकी 3 लाख 31 हजार सरकारी आरोग्य विभागातील कर्मचारी असून बाकी खासगी क्षेत्रातील कर्मचारी आहेत.
‘पहिल्या टप्प्यात फक्त कोव्हिड योद्धा आणि ज्यांना जास्त धोका आहे, अशाच मंडळींना लस दिली जाणार आहे. त्यानंतरच्या टप्प्यात सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांना लस दिली जाईल, अशी माहिती मध्य प्रदेशचे आरोग्य मंत्री प्रभुराम चौधरी यांनी दिली आहे.







