मृत्यूस कारणीभूत दोषींवर कारवाई व्हावी : कुटुंबीयांची मागणी
जळगाव (प्रतिनिधी) – पाटबंधारे विभागातील कर्मचारी सुनिल धर्मा शिंदे ( वय ४५ ) रा. वाघ नगर जळगाव यांनी तीन दिवसांपूर्वी रात्री दिड वाजेच्या सुमारास आत्महत्येचा प्रयत्न केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दोन दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे.
तापी पाटबंधारे विभागील कर्मचारी सुनिल शिंदे यांनी जळगाव शहरातील काही लोकांकडून व्याजाने पैसे घेतले होते. परंतू काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्यांच्या कडून दहा ते पंधरा टक्के व्याजाने पैसे वसुल केले. एका महाभागाने दहा हजाराचे एक लाख वसुल केले. व्याजाचा धंदा करणाऱ्या लोकांच्या तगादयाला कंटाळून सुनिल शिंदे यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.
त्यामुळे त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. बुधवारी १६ फेब्रुवारी रोजी उपचार सुरू असताना त्यांचा अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दरम्यान यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांना अटक करावी अशी मागणी कुटुंबीयांतर्फे करण्यात आली आहे. पोलीस घटनेची माहिती घेत आहेत.
गुंडगिरी प्रवृत्तीचे ‘सावकार’
दरम्यान सुनील धर्मा शिंदे यांनी ज्या व्यक्तींकडून व्याजाने पैसे घेतले होते त्यात व्यक्ती या गुंडगिरी प्रवृत्तीच्या असल्याची माहिती मिळाली आहे.या व्यक्तींनी पाटबंधारे महामंडळात अनेक व्यक्तींना व्याजाने पैसे देऊन त्यांनाही शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले असल्याचे काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे या व्याजाचा धंदा करणाऱ्या अवैध सावकारांवर कडक कारवाई पोलीस दलाकडून झाली पाहिजे अशी मागणी कुटुंबीय व त्यांच्या मित्र परिवाराने केली आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केली तर यातून दोषींची नावे बाहेर येऊन त्यांच्यावर कारवाई करता येणे शक्य आहे.मयत सुनील शिंदे यांचे कॉल डिटेल्स आणि काही डायऱ्या तपासल्या तर संबंधित दोषींची नावे आढळतील अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.