जळगाव (प्रतिनिधी) – शहरात गेल्या काही दिवसापासून साफसफाईच्या नावाने ओरड वाढत चालली आहे. वॉटरग्रेस कंपनीला काम करण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता मनपा प्रशासनाने लवकरात लवकर करून द्याव्या.
वॉटरग्रेसकडून काम करून घेण्याची जबाबदारी प्रत्येक आरोग्य निरीक्षकाने चोख पार पाडावी अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. तसेच दररोज कार्यरत असलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचा हजेरीतक्ता आणि प्रत्यक्षात कार्यरत असलेले कर्मचारी यात तफावत आढळून आल्यास बडतर्फची कारवाई करण्यात येईल असेही महापौरांनी स्पष्ट केले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील साफसफाईच्या कामाचा आढावा घेण्यासाठी सोमवारी महापौरांनी त्यांच्या दालनात बैठक बोलावली होती. बैठकीला स्थायी समिती सभापती ऍड.शुचिता हाडा, मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी, गटनेते भगत बालाणी, नवनाथ दारकुंडे, ऍड.दिलीप पोकळे, आरोग्यधिकारी उदय पाटील, विकास पाटील, मलेरिया विभाग प्रमुख सुधीर सोनवाल, वॉटरग्रेसचे प्रतिनिधी, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते.
शहरातील कचरा संकलन आणि विल्हेवाट लावण्यासाठी वॉटरग्रेस कंपनीकडून पुन्हा काम सुरू करण्यात आले आहे. वॉटरग्रेसला काम देताना मनपा प्रशासनाकडून ज्या काही पूर्तता करायच्या आहेत त्या तात्काळ पूर्ण कराव्या जेणेकरून वॉटरग्रेसकडून काही हलगर्जीपणा झाल्यास त्यावर कारवाई करताना अडचण येणार नाही, असे महापौर सौ.भारती सोनवणे यांनी सांगितले.
सर्व व्यापारी संकुल, औद्योगिक वसाहत, बाजार पट्टा साफसफाई करा, रात्रीची साफसफाई मोहीम तीव्र करा, मनुष्यबळ वाढवा, गटारींच्या काठावर वाढलेली झुडपे साफ करा, ज्या खाजगी मोकळ्या जागांवर कचरा टाकण्यात येतो त्या जागा मालकांना नोटीस बजवा, अशा सूचना नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मांडल्या. तसेच कोणत्याही आरोग्य कर्मचाऱ्याला कोरोना संदर्भात काही लक्षणे असल्यास त्यांनी तात्काळ तपासणी करून घ्यावी असे आवाहन देखील नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले.
प्रत्येक प्रभागात आठवड्यातून एकवेळा फवारणी करावी, सर्व सेप्टिक टँकला जाळ्या बसविणे, पाणी साठविण्याच्या टाक्या आठवड्यातून एक दिवस स्वच्छ करा, गटारींची नियमीत सफाई करा, प्रत्येक घराघरातील कचरा संकलन करा, कचरा कुठेही पडून राहणार नाही याची खबरदारी घ्या अशा सूचना मनपा आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी केल्या.
महापौर केव्हाही, कोणत्याही प्रभागात करणार पाहणी
जळगाव शहरात साफसफाई आणि स्वच्छतेचे काम योग्य प्रकारे होते आहे की नाही हे तपासण्यासाठी महापौर स्थानिक नगरसेवक आणि मनपा अधिकाऱ्यांना घेऊन अचानक पाहणी करणार आहे. संबंधित परिसरात काम करणारे कर्मचारी, हजेरीपट, साफसफाईचे काम याची पाहणी त्या करणार आहेत. पाहणी दौऱ्यात काही हलगर्जीपणा आढळून आला तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील महापौर सौ.भारती सोनवणे यांनी दिला आहे.
नागरिकांनी तक्रार करावी
आपल्या प्रभागात किंवा घराच्या आसपास स्वच्छता होत नसल्यास किंवा कचरा संकलन केले जात नसल्यास नागरिक आणि त्या त्या परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर यांनी फोनद्वारे तक्रार नोंदवावी. महापौर कार्यालयाचा क्रमांक 0257-2226525 यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे महापौरांनी कळविले आहे.